Ad will apear here
Next
नर्मदातीरी मी सदा मस्त...
‘नर्मदातीरी मी सदा मस्त’ हे सदानंद येरवडेकर यांच्या लेखणीतून उतरलेले पुस्तक आहे. त्यातून नर्मदा परिक्रमेचा इतिवृत्तांत समोर येतो. ही परिक्रमेची दैनंदिनीच असल्याने परिक्रमा करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक आदर्श वस्तुपाठच आहे. परिक्रमेची पूर्वतयारी, काळजी, अनुभव, संकटे आणि समाधान अशी समग्र माहिती पुस्तकात आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
......
सकाळी उठून सर्वांचा निरोप घेऊन राजघाटमधून बाहेर पडलो. पुढे दोन किलोमीटरवरील पाटीने माझे लक्ष वेधून घेतले. ‘शूलपाणी झाडीकडे.’ मी हमरस्ता सोडून त्या पाऊलवाटेने वाटचाल सुरू केली. आता जवळजवळ दोन-तीन दिवस मैयाचे दर्शन होणार नव्हते. त्यामुळे थोडी नाराजी होती. कारण मैयाच्या किनाऱ्यावरून जाताना एक फायदा असा असतो, की कुणाला वाट विचारावी लागत नाही. जशी मैया जाईल तसे चालत जायचे; पण रस्त्यावरून जाताना मात्र प्रत्येक एक-दोन किलोमीटर गेल्यावर गावातील लोकांना विचारून जावे लागते. 

आजचा रस्ता जंगलवाट. डांबरी रस्ता. त्यामुळे वाटेत फारच वर्दळ कमी. लहान लहान गावे लागत होती. त्यामुळे जेवणाचे हाल, एका टपरीवर दुपारी नमकीन घेऊन त्यावर भूक भागवली. वाटेतील जामदाबैडी, गणेशपुरा, जागरवा अमलदा अशा गावातून वाटचाल सुरू. आता खऱ्या अर्थाने जंगल सुरू झाले होते. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. अंधार पडायला हळूहळू सुरुवात झाली. माणसे दिसेनाशी झाली. तुरळक रहदारी. मनात मैयाचा धावा. आता जरा भीती वाटायला लागली. अजून जवळजवळ पुढचे गाव चार किलोमीटरवर होते. आता अधिकच अंधार पडायला सुरुवात झाली. मी माझ्या मैयाच्या जपात इतका एकरूप झालो होतो, की एक फटफटीवाला माझ्याजवळ येऊन थांबला आणि म्हणाला, ‘ध्यान किधर है?’ मी तेव्हा त्याच्याकडे पाहिले. तो मला म्हणत होता, ‘बाबाजी ये लो पपिता (पपई).’ मी म्हणालो, मला आवडत नाही; पण त्याने खूपच आग्रह केला. मग एक फोड देऊन तो सुसाट बाइकवरून निघून गेला. 

आता अंधार खूपच झाला होता व आज माझी चालपण खूप झाली होती. आता भितीने माझी चाल मंदावली. मी एकटाच चालत होतो. इतक्यात माझ्या समोरच्या झाडीमधून एक फाटक्या कपड्यातला, दाढी वाढलेला, सात-आठ फूट उंच, बलाढ्य देह असा एक भिकारी अवस्थेतला माणूस येऊन उभा राहिला. त्याला पाहून मी खूप घाबरलो होतो. दाट जंगल. मी एकटाच! आणि माझ्या समोर हा माणूस. तो म्हणाला, की ‘मुझे बिस्कीट का पुडा दो।’ मी म्हणालो, ‘माझ्याजवळ नाही.’ पण माझ्या हातातील पपईची फोड मी त्याला दिली असे मला वाटले; पण ती त्याने ओढूनच घेतली असावी. कारण पुढील दोन मिनिटे माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. 

मी जेव्हा बघितले तेव्हा ती व्यक्ती माझ्यासमोर नव्हती. आता मला घाम फुटायची वेळ आली होती. मी खूप जोरात मैयाचा धावा गेला व चाल वाढवली. अर्ध्या तासात बिजासन गावात येऊन पोहोचलो, जे संपूर्ण दाट जंगलात आहे. तेथील राधाकृष्ण मंदिरात मुक्काम केला. गावातील लोकांनी रात्री जेवण आणून दिले. रात्री मला झोप येत नव्हती. सारखा संध्याकाळचा तो प्रसंग मला आठवत होता. मला असे वाटते, की मला अश्वत्थामा यांनीच बहुतेक दर्शन दिले असावे. मैयाचे आभार मानून त्या आठवणीत मला कधी झोप लागली कळलेच नाही. बिजासनच्या पुढे खरे शूलपाणीचे जंगल सुरू होते.

(‘नर्मदातीरी मी सदा मस्त’ हे सदानंद येरवडेकर यांचे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZWHCI
Similar Posts
असं हे वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापूर... ‘रांगडेपणाबरोबर अंगात गुरगुर आणि मस्ती असणारी, रंगेलपणा अन् शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी आणि ‘चैनीत’, ‘निवांत’ असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी अघळपघळ मनाची माणसं म्हटलं, की ती कोल्हापूरचीच असणार. दुसरी कुठली?’ समकालीन
प्रबळगड ट्रेक गेली १५हून अधिक वर्षे सह्याद्रीतील वाटांवर सातत्याने आणि सहज भटकंती करणारे सुशील दुधाणे यांचे ‘घाट वाटा’ हे पुस्तक एक सुगम वाटाड्या म्हणून ट्रेकर्सना उपयुक्त आहे. पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील आनंददायी सफरींचे वर्णन या पुस्तकात आले आहे. रायगड जिल्ह्यातील प्रबळगडाच्या भटकंतीबद्दल मार्गदर्शन
पर्यटकांसाठी खूशखबर; नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये सुसज्ज पेड एसी वेटिंग रूम नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकात आउटसोर्सिंग तत्त्वावर पेड एसी वेटिंग रूम (व्हीआयपी लाउंज) सुरू होणार आहे. तिकीट बुकिंग ऑफिसच्या वरच्या जागेत सर्व सोयींनी युक्त अशी ही रूम साकारण्यात येत असून, प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
मुंबई पर्यटन : राजभवन, वाळकेश्वर आणि परिसर... ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण मुंबईतील गिरगाव आणि मलबार हिल परिसरातील काही ठिकाणे पाहिली. आजच्या भागात मलबार हिलवरील वाळकेश्वर, राजभवन यांसह अन्य ठिकाणांची माहिती घेऊ या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language